यशवंत महाविद्यालयात संगीत विभागातर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
यशवंत महाविद्यालयात संगीत विभागातर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
( नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा )
वर्धा | यशवंत महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन तसेच बापूरावजी देशमुख (दाआजी) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. रवींद्र बेले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ. एन. एच. खोडे, संगीत विभागप्रमुख प्रा. अरुणा हरले तसेच कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. निकिता निर्मळ व्यासपीठावर उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात डॉ. निकिता निर्मळ यांनी भारतीय संस्कृतीतील गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व, गुरू-शिष्य परंपरेचा समृद्ध वारसा आणि संगीत क्षेत्रातील गुरूंचे योगदान यावर प्रकाश टाकला. गुरुपौर्णिमेचे सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व विशद करताना गुरू हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी डॉ. एन. एच. खोडे यांनी गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कार तसेच कला व संगीताच्या जडणघडणीत गुरूंचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. रवींद्र बेले यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच संगीत, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले. गुरुपौर्णिमा हा केवळ उत्सव नसून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचा दिवस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संगीत विभागप्रमुख प्रा. अरुणा हरले यांनी संगीत क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद करत संगीत साधनेत गुरूचे स्थान सर्वोच्च असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात 'नमन नमन, सौ बार नमन' या गुरुवंदनेने झाली. या सादरीकरणाला डॉ. निकिता निर्मळ यांचे मार्गदर्शन लाभले. अनुष्का भानसे, अभिलाषा तरवटकर व अनुष्का चुटे यांनी गुरुवंदना सादर केली. तबल्यावर रोमित गलांडे, तर हार्मोनियमवर ओम चुटे यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनुष्का भानसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. अभिलाषा तरवटकर यांनी मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास प्राध्यापकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.